‘BEFORE THE FLOOD’
Documentary screening at Langdon hall, Auburn university
November 3, 2016
फिशर स्टीवन्स आणि
लिओनार्डो डिकॅप्रियो यांचा ‘BEFORE THE
FLOOD’ हा माहितीपट म्हणजे आधुनिक जगातील सर्वात गहन आणि तरीही दुर्लक्षित अशा हवामानातील
बदलावर केलेले कठोर भाष्य आहे . Climate
change, म्हणजेच पृथ्वीच्या
पर्यावरणात मानवी कृतींमुळे झालेले बदल हा २१ व्या शतकातील सर्वात मोठी समस्या असण्याचा
दावा केला गेला असून जगातील सर्व भागांत आणि देशांना त्याची झळ लागत आहे. त्यात भर
म्हणजे जगभरातील उद्योजक, प्रशासक आणि ग्राहक
पुरेशा समजुतीअभावी या प्रश्नाकडे नेहमीच
दुर्लक्ष करत आलेले आहेत.
माहितीपटाचे नाव हे 'the
garden of earthly delights' नावाच्या एका प्रसिद्ध कलाकृतीच्या दुसर्या
चित्रातून प्रभावित झालेले आहे. पृथ्वीचा नाश होण्याच्या आधीचे चित्र या भागात
कलाकाराने रेखाटलय. या कथेचा एक रूपक म्हणून वापर करून, आजच्या जगातील परिस्थीतीची
कल्पना केली गेली आहे, ज्या अर्थी हवामान बदलाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्यास पर्यावरणीय
विनाश अटळ आहे.
मागील ४० वर्षांत जीवाश्म इंधनांचा अविवेकी वापर केल्याने पूर्ण
जगभरात झालेल्या वायू आणि पाण्याच्या प्रदूषणाची चाचपणी केली गेली. त्यातून आलेले
निष्कर्ष धक्कादायक आहेत. पाश्चात्य देशांत चाललेल्या अनिर्बंध विकासापोटी ज्या
देशांना अजून विकासाचे वारे पूर्णपणे लागले नाहीत त्यांना याची झळ सहन करावी लागत
आहे. एका दृष्यानुसार, चीन मधील एक औद्योगिक शहर , जे जगाचे उत्पादन केंद्र म्हणून
समजले जाते, तेथे दिवसाला होणारे प्रदूषण हे पूर्ण अमेरिकेत होणार्या प्रदूषणाइतके
गणले गेले.
जीवाश्म इंधनांच्या वापरावर, तसेच हवेत सतत जाणार्या प्रदूषित
वायुंवर होणारे उपाय व्यक्तिगत बदलांतून आणि धोरणात्मक बदलांतून अशा दोन्ही
मार्गाने करता येतील. माहितीपटाच्या ओघानुसार यातील व्यक्तिगत उपायांचा काळ आता
लोटून गेलेला आहे. कितीही प्रयत्न केले तरी जीवाश्म इंधनांवर आणि पर्यावरणाचा
विनाश करणाऱ्या उद्योगांतून उभी राहिलेली व्यापाराची साखळी ही व्यक्तिगत सवयींतून होणार्या
बदलांच्या आवाक्यापलीकडली आहे. आता विकसित देशांचे प्रशासन आणि मोठे उद्योग यांना
बदलायला सांगणे महत्त्वाचे आहे. पूर्ण जगात कुठेही गेले तरी सरकार लोकांच्या
मानसिकतेप्रमाणे आपली धोरणे बदलते हे नक्की. तेव्हा विविध मार्गाने जनतेने
पर्यावरणाच्या संवर्धनाला आपला पाठींबा दाखवणे महत्त्वाचे आहे.
Centre for Science and
Environment या संशोधन संस्थेच्या सुनिता नारायण यांनी आपले खडतर मत
व्यक्त केले. अमेरिकेसारखे प्रगत देश इतरांना जीवाश्मांचा वापर आणि प्रदूषण कमी करायला सांगत असताना त्यांच्या जीवनशैलीत बदल करायला मात्र तयार होत
नाहीत. एका अभ्यासानुसार, अमेरिकेतील व्यक्तीचा
सरासरी उर्जेचा वापर भारतातील व्यक्तीच्या ३४ पट आहे. तेव्हा प्रगत देशांनी
पुढाकार घेऊन उद्योगांच्या आणि पायाभूत सुविधांच्या शैलीत मोठे बदल घडवायला
सुरुवात केल्यास इतर देश त्याचा आदर्श घेऊ शकतील. भारतासारख्या प्रगतीशील देशात
आजही जवळपास ३० कोटी लोकांपर्यंत वीज पोहोचलेली नाही. तेव्हा पर्यावरणाच्या
प्रश्नाआधी विजेच्या उपलब्धीला प्राधान्य दिले जाणार आणि त्यापायी जीवाश्मांचा
मोठ्या प्रमाणावर वापर अनिवार्यच असणार. अशा वेळी जास्तीत जास्त प्रमाणात
अपारंपरिक ऊर्जास्त्रोतांचा वापर करणे हे भविष्याला अनुसरून एक मोठे योगदान म्हणता
येईल.
‘टेसला’ सारख्या कंपन्या हवामानातील बदलाच्या प्रश्नावर
तोडगा काढण्यासाठी तांत्रिक विकास करण्यात पुढाकार घेत आहेत. पण तरीही मोठ्या
प्रमाणावर इच्छाशक्तीचा अभाव हा या लाटेच्या प्रसारातील मुख्य अडथळा असल्याचे
सांगितले गेले. धोरणात्मक बदल होण्यात लोकांच्या मताचा आणि मानसिकतेचा खूप मोठा वाटा असतो हे इथे लक्षात घेतले
पाहिजे.
पायर सेलर्स या अंतराळवीराच्या आशादायी मनोगताने या
माहितीपटाची शेवट होते ..
“ हो, अजूनही आशा आहे.. मी एक सकारात्मक व्यक्ती आहे. माझा
लोकांवर विश्वास आहे . आणि मला वाटते कि जेव्हा लोक या प्रश्नाबद्दल
असणाऱ्या अनिश्चिततेतून
बाहेर येतील , उघड्या डोळ्यांनी याकडे एका
पातळीवर एक खरीखुरी समस्या म्हणून
पाहायला सुरुवात करतील, आणि
जर यावर योग्य कृती करण्याची त्यांना काही प्रमाणात
समज दिली गेली
असेल, तर ते तसे नक्की करतील “