Monday, May 27, 2013

श्रम संस्कार छावणी, २०१३
सोमनाथ प्रकल्प
        सुरुवात झाली दि. १३ मे ला मुंबई ते चंद्रपूर या प्रवासाने. वाटेत इगतपुरी जवळ दिसणारे सुंदर दऱ्या-खोर्यांचे दृश्य आणि याला अनुसरूनच असलेली संध्याकाळची सूर्यास्ताची वेळ यामुळे प्रवास सुंदर रीतीने चालू झाला. जाताना वाटेत रेल्वे मध्ये अनेक सहयात्रीही भेटले. सर्वच जण एका नव्या अनुभवासाठी, तसेच ८ दिवस एका नव्या जगात राहण्यासाठी उत्सुक होते. मुंबईहून बल्लारशाह ला जाणारी सेवाग्राम एक्सप्रेस वाटेत वर्ध्याला सुमारे ३ तासांसाठी थांबते. या वेळेत प्रवासी खाली उतरून अक्षरशः badminton खेळू लागले. अशा अनेक अनुभवांनी प्रवास मजेशीर झाला.



श्रमदानाचे महत्व
आनंदवनाचे श्रम ही है श्री राम हमाराहे ब्रीदवाक्य. येथील सर्व कुष्ठरोगी, अंध, अपंग, अनाथ यांनी बाबा आमटेंचा हाच मार्ग अवलंबून आपल्या श्रमाच्या दिव्यांनी प्रकाश आणला. आपल्याला जे मिळाले नाही, त्यासाठी दुसऱ्यांकडे याचना करत न बसता स्वतःच आपल्या कष्टांच्या जोरावर ते मिळवायला हवे, हि बाबांची थोर शिकवण.
‘Give them a chance, not charity’ – Baba Amte

पांगळ्या व्यक्तींना एकदा संधी देऊन पहा, दान नाही. कारण दान माणसाला दुर्बल बनवते, पण संधी माणसाला सक्षम करते. श्रम केल्याने माणसाला त्याच्या क्षमतेची जाणीव होते. स्वबळावर काही करण्याचा आत्मविश्वास निर्माण होतो. कष्टांचे महत्व कळते आणि त्याबरोबरच गरजुना श्रम करण्यास उद्युक्त करण्याआधी स्वतःहून त्या श्रमकार्याचा अनुभव घेण्याची संधी मिळते. सोमनाथ प्रकल्पातील श्रमसंस्कार छावणीमध्ये याच श्रमदानाचे महत्व पटवून देण्यासाठी सुमारे ३५० शिबिरार्थी रोज्या सकाळी ५:३० ते १०:०० वा. पर्यंत गावातील विविध कामांसाठी श्रमदान करीत असत. यामध्ये तलावाचे रुंदिकरण, तलाव परिसरात बंध घालणे, तेथील दगड-धोंडे काढून टाकणे, शेतातील तण व काड्या काढून शेत साफ करणे अशी विविध कार्ये केली गेली. य कामांवर होणारा शेत्माजुरीचा खर्च त्यामुळे वाचवता आला. या कामांमुळे नक्कीच पुढील वर्षी तलावात मुबलक प्रमाणात पाणी साठेल व त्याचा पिण्यासाठी आणि इतर वापरांसाठी गावकऱ्यांना नक्कीच फायदा होईल. या समाधानाने सर्वांचीच माने आनंदित झाली.
भाऊंच्या ( डॉ. विकास आमटे ) १६ मे रोजी झालेल्या मार्गदर्शनानंतर असेही कळले कि या सोमनाथ परिसरात जेव्हा बाबांनी अनेक दशकांपूर्वी काम सुरु केले, तेव्हा येथे पिण्याच्या पाण्याचीही सोय नव्हती. केवळ घनदाट जंगल व श्वापदांचा वावर होता ( जो आजही आहे ! ). गावातील वाहणाऱ्या झऱ्याचे पाणी गावकऱ्यांनी बाबांना वापरू दिले नाही. बाबांनी कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी विकसित केलेला हा प्रकल्प असल्याने अर्थातच कुष्ठारोग्यांबद्दल असलेल्या समाजातील तिरस्काराच्या भावनेमुळे लोकांचा आधीपासूनच या प्रकल्पाला या न त्या कारणाने विरोध होता. पण तरीही आपल्या कुष्ठरोगी व अपंग सहकाऱ्यांच्या मदतीने बाबांनी येथे अनेक तलाव, विहिरी बांधल्या आणि आज हे गांव पाण्यासाठी स्वयंपूर्ण आहे. इतकेच नाही, तर येथील वापरावयास मिळणारे पाणीसुद्धा अतिशय स्वच्छ व पिण्याचे पाणी शुद्ध आहे.
येथे श्रम करत असताना अनेकदा पहाटे लवकर उठण्याचा कंटाळा आला, उन्हाच्या झाला नकोश्या झाल्या. कष्टाने हात पाय जड झाले. पण तरीही जेव्हा बहुभाषिक स्फूर्तिगीते गात आपल्या गटाबरोबर श्रमदानाला जाण्याची वेळ येई तेव्हा नकळतच अंगात एक वेगळा उत्साह संचारत असे. खरी ताकद आपल्या मनगटात असतेअसे बाबा आमटे म्हणत. आपल्या हातांनी आपण इतर कुणाच्या जीवनात आनंद फुलवत आहोत हि भावनाच मनाला इतकी सुखावणारी आहे, की ती मनाला एक नवे बळ देते.
संपूर्ण सोमनाथ प्रकल्पात बाबा अथवा साधनाताई यांचे एकही छायाचित्र नाही. हि खरंच आश्चर्याची गोष्ट वाटेल. पण तरीही बाबांच्या विचारांचा येथील प्रत्येकाच्या मनावर इतका तगडा प्रभाव आहे, की जो इतर कुठल्याही ठिकाणी पाहायला मिळणार नाही. बाबा आमटे यांच्या विचारांवरील गाढ श्रद्धा येथील प्रत्येकाच्याच कृतीतून दिसून येते. बाबा आमटे यांचे विचार, जे त्यांनी आपल्या कार्यातून व्यक्त केले. ते पुढे नेण्याचे काम सर्वच जण, येथे आलेला अगदी प्रत्येक शिबिरार्थी आपले सर्वस्व पणाला लावून करत असे.

    


स्वावलंबन
श्रम संस्कार छावणीने आम्हाला स्वावलंबनाचे धडे दिले. आपले ताट जेवल्यानंतर आपणच स्वच्छ करण्यापासून, आळीपाळीने सर्व गटांनी भोजनाची तसेच साफसफाईची व्यवस्था करण्यापासून ते स्वयंशिस्तीचा पायंडा घालण्यापर्यंत अनेक गोष्टींमधून आपले काम आपणच करण्याची चांगली सवय येथे लागली जी अजूनही सोडता येत नाही ! ता. १५ मे रोजी डॉ. आशिष सानव यांच्या व्याख्यानांतून म्हणा, किंवा डॉ. प्रकाश आमटे यांचे प्रकाशवाटाहे पुस्तक वाचताना म्हणा, हीच स्वावलंबनाची सवय त्यांना कशी उपयोगात आली, हे दिसून आले होते.
सामाजिक भान
या छावणीत असताना मनावर हळूहळू संस्कार होऊ लागतात. सामाजिक भान असलेले सुमारे ४०० लोक जेव्हा एकत्र येतात, तेव्हा त्या समूहाचा परिणाम नक्कीच आपल्या मनावर होतो. यामुळे आपण स्वतःहूनच जबाबदारीने वागू लागतो. अन्न, पाणी वाया न घालवणे हासुद्धा यापैकीच एक माझ्या मनावर या काळात ठसलेला संस्कार. यावरून आठवलेली एक घटना सांगतो. छावणीचा पहिला की दुसरा दिवस. दुपारच्या जेवणावेळी माझ्या ताटात काही अन्न बाकी राहिले. तिथे उभ्या असलेल्या पेशवे सरांनी सांगितल्याप्रमाणे मी ते अन्न संपवण्याचा प्रयत्न केला, पण तरीही काही उष्टे अन्न ताटात बाकी राहिलेच. आता ताट धुवण्याआधी उरलेले खरकटे एका भांड्यात टाकावे लागते. तेथे मिरेन नावाचा एक शिबिरार्थी उभा होता. मी बरेच खरकटे तेथे टाकणार याआधी त्याने मला ते संपवण्यास सांगितले. पण मी काही ते ऐकले नाही. तेव्हा त्याने मला ते खरकटे फेकू न देता स्वतः खाल्ले. हे पाहून मी खरंच खूप शरमलो. यानंतर उरलेल्या सात दिवसांमध्ये मी नाश्ता, दुपारचे अथवा रात्रीचे जेवण या वेळांना कधीच ताटात जेवण उष्टे टाकले नाही आणि ती सवय आज घरी आल्यानंतरही कायम आहे.





जिद्द
एक मला आश्चर्यचकित करून सोडणारी छावणीतली गोष्ट म्हणजे येथे सर्व स्तरांतील आणि सर्व वयोगटांतील लोक सहभागी झाले असून सर्वांचाच उत्साह वाखाणण्याजोगा आहे. आपल्या रोजच्या आयुष्यात कितीही ऐशोआरामात जगण्याची सवय असतानासुद्धा मोठ्या शहरांतील सर्वच जण किती समाधानाने आणि उत्साहाने या लहानशा खेडेगावात राहत आहेत याचे फारच अप्रूप आणि कौतुक वाटले. बाबा आमटे आणि आनंदवनाच्या कार्यातून स्फूर्ती घेऊन समाजासाठी काही करण्याच्या ध्यासाने सर्वांनाच झपाटलेलं होतं. सर्व आर्थिक स्तरांतील लोक हातात हात घेऊन काम करत असत. मनात विचार एकच बाबांनी तेजोमय केलेल्या दिव्याने समाजातील सर्व अंधःकार दूर करायचा !
या छावणीत आलेल्या वयोवृद्ध शिबिरार्थींचा उत्साह तर वाखाणण्याजोगा होता. ६० च्यावर वय असूनसुद्धा सर्वच श्रमकार्यास नेहमी हजर राहत असत. त्यांना काम करताना पाहून सर्वांनाच स्फूर्ती मिळत असे. याबरोबरच अगदी पाच वर्षांखालील वय असलेली बालके सुद्धा आनंदाने सर्वांबरोबर राहत व उत्साहीपणे सर्व कामांमध्ये मदत करत. त्यांचा तो उत्साह सर्वांच्याच मानाला चेतना देणारा होता.
मला प्रश्न पडत असे, की इतके सारे लोक, ज्यांना इतर वेळी ऐशोआरामात व अतिशय सहज अशा जगण्याची सवय असताना श्रमसंस्कार छावणीच्या या ८ दिवसांत सर्वजण कसे या वेगळ्या जीवनशैलीशी इतक्या पटकन एकरूप होऊन जातात ! थोड्या विचाराअंती लक्षात आले, की मनातली जिद्द आणि बाबांकडून मिळालेली कष्ट करण्याची प्रेरणा हे माणसाला आतूनच इतके कणखर बनवतात की बाहेरचे ५० डिग्री चे तापमानही तो निर्धार तोडू शकत नाही.







व्यसनविरहित गाव
सोमनाथ प्रकल्प हे कुष्ठरोगी व अपंग यांनी वसवलेले गाव आहे. आनंदवन व इतर महारोगी सेवा समितीच्या प्रकल्पांसाठी लागणारी शेती येथे केली जाते. या गावात भ्रमण करत असताना आम्ही अनेक गावकऱ्यांशी चर्चा केल्या, त्यातून अनेक आश्चर्यकारक गोष्टी समोर आल्या. अनेक गोष्टी पहिल्या. गावात कोणीही कुठलेही व्यसन करत नाही. सर्वसाधारणपणे कुठल्याही गावात झाडाखाली तंबाखू मळत बसलेली माणसे येथे दिसत नाहीत. गावात कुठेही कोणीही रिकामटेकडे बसलेले दिसत नाही. कोणीही फुकटचे बसून खात नाही. सर्वांना त्यांच्या कार्याक्षमतेनुसार आपापली कामे वाटून दिली गेली असल्याने सर्वजण ती स्वतः जबाबदारी घेऊन करत असतात. आज बाबा आमटे या जगात नसले, तरीही त्यांच्यावर असणारी सर्वांची श्रद्धा आणि प्रेम येथील चराचरातून दिसून येते.
गावात कुठेही मंदिर नाही. श्रम ही है श्री राम हमाराअसे म्हणणाऱ्या बाबांनी सर्वांना श्रमातच आपला देव दाखविला. हाथ लगे निर्माण में, नही मांगने, नही मारनेबाबांनी कुष्ठरोग्यांच्या आणि अपंगांच्या हातांना कष्ट करायला शिकविले. या कष्टाच्या जोरावर त्यांनी आनंदवन आणि सोमनाथ सारखी श्रमांनी परिपूर्ण अशी गावे उभी केली. आपले हात मागण्यासाठी किंवा कोणाला मारण्यासाठी न वापरता त्याच हातांनी श्रम करून ते नवनिर्माणात जेव्हा लावले जातील, तेव्हाच आपण आपला व समाजाचा विकास साधू शकतो ही बाबांची शिकवण.





कृतीशील व्यक्तींचे मार्गदर्शन
डॉ. आशिष सानव हे नागपूर येथून वैद्यकीय शिक्षण घेतलेले एका श्रीमंत घरात जन्मलेले तरुण डॉक्टर. शिक्षणानंतर त्यांनी अमरावती मधील मेळघार येथे मागासलेल्या आणि अतिदुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासींच्या आरोग्यासाठी कार्य करणे सुरु केले. मेळघारात अतिशय समृद्ध अशी नैसर्गिक साधनसंपत्ती असताना देखील केवळ त्या समाजात असणारे गैरसमज, अंधश्रद्धा, रूढ चालीरीती आणि जाचक परंपरा यांमुळे येथील आदिवासींचे जीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते. कुपोषण, बालमृत्यू, रोगराई, व्यसनाधीनता यांच्या जाळ्यात हा समाज सापडला होता. अशा या ठिकाणी डॉ. सानव यांनी आपल्या डॉक्टर असलेल्या पत्नीसह आदिवासींमध्ये आरोग्याचे धडे देण्याचे काम सुरु केले. सुरुवातीला एका झाडाखाली सुरु झालेल्या दवाखान्याचे रुपांतर नंतर संपूर्ण सुविधांनी युक्त अशा सुसज्ज अस्पितळात करण्यात आले. तेथील महिलांना उपचारांचे प्रशिक्षण देऊन त्यांना आरोग्याच्या बाबतीत स्वावलंबी करण्यात आले. आज त्यांच्या या कार्यामुळे मेळघाटातील बालमृत्यूचे प्रमाण लक्षणीयरित्या कमी झालेले दिसून येते. डॉ. अभय व डॉ. राणी बंग यांची कार्यभूमिसुद्धा हाच मेळघाट.
       डॉ. सानव यांच्या कामाची माहिती आणि त्यांना वाटेत आलेल्या अनेक अडीअडचणीबद्दल त्यांच्याकडूनच ऐकताना सर्वांचेच मन दाटून आले होते. सर्व संकटांशी, कित्येक वेळा खोट्या पोलीस केसलाही तोंड द्यावे लागल्याने होणाऱ्या अडथळ्यांचाही सामना त्यांनी किती निर्धाराने केला, हे पाहून सर्वच जण थक्क झाले. प्रश्नोत्तराच्या सत्रात डॉ. सानव यांना एक प्रश्न आला होता – ‘डॉ. सानव यांचे Personal Plans काय आहेत भविष्यात ?’
याबद्दल सांगताना डॉ. सानव म्हणाले – ‘MAHAN ( त्यांची संस्था ) च्या कामाशिवाय वेगळे असे काही ठरवण्याचे ठरवलेले नाही. दुसरे काही नक्की नसेल, तरी मी संपूर्ण आयुष्य मेळघाटातच काढणार हे नक्की’. त्यांचे हे उत्तर ऐकून माझे डोळेही नकळत पाणावले आणि मनोमन या शूर ध्येयवादी सामाजरत्नाला सलाम केला.
भारतात १९८४ मध्ये पंतप्रधान इंदिरा गांधींच्या हत्येनंतर दंगली उसळल्या. यांत भारतीयांचा आपल्या बांधवांशीच संघर्ष घडून आला. भारताची राष्ट्रीय एकात्मता ढासळते की काय असे वाटल्याने देशाला एकत्र जोडण्यासाठी जाणीवपुर्व प्रयत्न करण्याची गरज निर्माण होऊ लागली. अशा वेळी बाबा आमटेंनी श्रम संस्कार छावणीत त्या वर्षी आलेल्या तरुणांना देशभरातून जाणारी एक यात्रा काढण्याचे आणि देशाला जोडण्यासाठी जीवाची आहुती देण्याचे आवाहन केले. या आव्हानाला साथ देऊन हजारो तरुण-तरुणींचे या यात्रेत सामील होण्यासाठी अर्ज आले. यांतून सुमारे शंभर जणांना घेऊन बाबांनी कन्याकुमारी ते काश्मीर अशी सायकल यात्रा केली. या यात्रेत त्यांनी अनेक राज्य, खेडी, शहरे पहिली. राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश यातून दिला गेला. धमक्यांना व दंगलींना न घाबरता पंजाबमधुनही या यात्रेकरूंनी आपले मार्गक्रमण निर्भयपणे केले. या आंदोलनाचे नाव – ‘भारत जोडो’.

सुमारे २८ वर्षांपूर्वी झालेल्या या भारत जोडो आंदोलनातील यात्रींनी या छावणीत मार्गदर्शन केले. या यात्रेतील त्यांच्या आठवणी ऐकताना खरंच अंगावर शहारे आले. बी.ई. शिकलेल्या तरुणापासून ते चौथी शिकलेल्या ग्रामीण मुलीपर्यंत, तसेच तीन बाळांच्या आई पासून ते एकच पाय असलेल्या अपंगांपर्यंत असे अनेक प्रांतातील अनेक सामाजिक स्तरांतील तरुण-तरुणी या आंदोलनात होते. सर्व गाव-शहरांतून जाताना भरभरून केले जाणारे स्वागत, तसेच पंजाबमध्ये शिरण्याआधी दहशतवाद्यांकडून यात्रा पुढे न नेण्याची आलेली धमकी हे सर्व रोमांचक अनुभव या भारत जोडोच्या यात्रींकडून ऐकायला मिळाले. भारताची राष्ट्रीय एकात्मता पुन्हा एकदा सुधृड करण्याची गरज लक्षात घेऊन पुन्हा २० वर्षांनी, तसेच त्यानंतरसुद्धा २०१३ मध्ये North-East ते गुजरात अशा यात्रा काढण्यात आल्या. याबरोबरच नव्याने यांत चैतन्य भरण्यासाठी अजून एका भारत जोडोयात्रेची बांधणी २०१३ च्या शिबिरात सुरु झली.
आपल्या विचारांचे अंधानुकरण करत जेव्हा विभागला गेलेला समाज महापुरुषांच्या नजरेत पडतो, तेव्हा तेच म्हणतात

आम्ही सारे एक आहोत, तुमच्यात एकी हवी आहे
कारण तुमच्या एकीतच, आमच्या विचारांचा विजय आहे.
अशा या देशातील लोकांची मने जोडणाऱ्या भारत जोडोअभियानाला सर्व शिबिरार्थीनचा भरभरून पाठींबा मिळाला.
दिलासा ही यवतमाळ येथे ग्रामीण भागात जलसंधारणासाठी काम करणारी संस्था. फडसिंचनाची पद्धत वापरून अनेक शेतकऱ्यांच्या शेतीसाठी त्यांनी पाण्याची सोय करून दिली. या संस्थेचे मधुकर धास हे येथे सर्वांना या सिंचन पद्धतीबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी आले होत. तेथील जमिनीवर निसर्गतःच असलेल्या उताराचा पुरेपूर फायदा करून घेत त्यंनी पाण्याच्या स्त्रोतापासून अनेक की.मी. अंतरावर पाणी पोहोचवले. अशा अनेक साध्या व सोप्या युक्त्या वापरून राज्यातील शेतीसाठी पाण्याचा प्रश्न सहज सोडवला जाऊ शकतो हे त्यांनी दाखवून दिले.
मुंबईतील TISS या संस्थेचे प्राध्यापक / विभागप्रमुख येथे आले होते. Social Entrepreneurship या विषयावर त्यांचे मार्गदर्शन लाभले. त्याबरोबरच त्यांच्या एका विद्यार्थ्याने ग्रामीण भागात केलेल्या शिक्षणविषयक कार्याची Case Study सुद्धा ऐकावयास मिळाली. संदीप या त्यांच्या विद्यार्थ्याने ग्रामीण भागातील तरुणांना त्यांच्या क्षमतेनुसार उपलब्ध असलेल्या भविष्यातील संधींची माहिती करून देण्याचे काम मध्य-प्रदेश मध्ये सुरु केले आहे. विद्यार्थ्यांना अगदी ४५ मि. मध्ये आधीपासून तयार केलेल्या माहिती कोष्टकाच्या ( database ) आधारे या संधींची माहिती शाळा-शाळांमध्ये जाऊन करून देता येते. भारतातील ७०% तरुण हे ग्रामीण भागात आहेत. त्यातील फक्त १४% तरुण हे उच्चशिक्षण घेतात ( १०वी च्या पुढे ). म्हणजे एकूण तरुणाईपैकी फक्त १०.८% ही आकडेवारी थक्क व हताश करणारी आहे. अनेक मोठमोठ्या संस्थांमध्ये फक्त रु. ३५० इतके वार्षिक शुल्क असूनही केवळ याबद्दल माहिती नसल्याने ग्रामीण व तसेच आर्थिक दृष्ट्या कमकुवत विद्यार्थी यापासून वंचित राहतात.
नव्या सामाजिक कार्याची सुरुवात करण्याबद्दलची दिशा दाखवताना प्राध्यापक यांनी Steve Jobs यांचे एक वाक्य सांगितले – “Innovation is nothing but connecting dots.” कोणत्याही समस्येवर तोडगा शोधण्यासाठी ती समस्या पूर्णपणे समजून घेतली पाहिजे. त्या समस्येशी निगडीत इतर कारणे व इतर समस्या यांच्यातील परस्परसंबंध जाणून घेतला की आपोआपच आपण त्या समस्येवर उपाय शोधून काढण्यात यशस्वी होतो. तसेच, असा उपाय समोर आल्यानंतर लगेचच तो लहान प्रमाणावर का होईना, पण अंमलात आणणे हे सुद्धा महत्वाचे आहे. आपले छोट्या स्तरावरचे यश पाहूनच लोक आपल्या कार्याला मदत करण्याचे धाडस दाखवतील. या व इतर मार्गाने येणाऱ्या आर्थिक सहकार्याच्या आधीसुद्धा आपल्या खिशातून गुंतवणूक करणे त्यांनी महत्वाचे असल्याचे सांगितले. कोणताही नवा प्रकल्प हाती घेतल्यावर त्यात असणाऱ्या निश्चीततेला समोर जाण्याबद्दल ते म्हणाले
Don’t take risk, but manage risk.

याबरोबरच, Risk ही प्रत्येकासाठी वेगळी असते असे त्यांनी म्हटले. काहींसाठी पैशाचा अपव्यय महाग ठरतो तर काहींसाठी वेळेचा. काही वेळा कमी खर्चात काम आटोपणे गरजेचे असते तर कधी कमीतकमी वेळात ते पूर्ण होणे आवश्यक ठरते. याप्रमाणेच, प्रत्येकाच्या क्षमतेनुसारही त्याने / तिने किती Risk घावी हे ठरविणे गरजेचे असते.
Mid-Carrer Crisis ची संकल्पना यात त्यांनी समजावून सांगितली. ३५ ते ४० या वयोगटामध्ये या प्रकारचा प्रश्न पडणे साहजिकच आहे. आपण ज्या करिअरच्या वाटेवर चालू लागलो आहोत, तोच आपल्यासाठी योग्य आहे का ? किंवा दुसरा ? याच मार्गाने आपले ध्येय गाठता येईल की दुसरा कोणता मार्ग अवलंबिणे उचित ठरले असते असा प्रश्न या काळात पडतो. त्याबद्दल मार्गदर्शन करताना आपली आवडनिवड व क्षमता यांचा विचार करूनच योग्य ती पावले उचलण्याचा सल्ला त्यांनी दिला. सामाजिक उद्योगीक्तेकडे जाणारा मार्ग हा चक्राकार ( spiral ) असून तो ( idea – result – implementation ) युक्ती परिणाम अनुसरण या मार्गाने जातो असे त्यांनी सांगितले. अशा कार्याची सुरुवात केल्यानंतर एकापुढे एक मार्ग दिसत जाणे ही एक स्वाभाविक अपेक्षा असते. पण तसे नाही झाले तरीही corridor approach अवलंबिण्याचे, म्हणजेच दिशा मिळते तशी वाट शोधत जाण्याचेही प्राध्यापकांनी सुचविले.
या सर्वांबरोबरच आणखीही आठवणीत राहिलेल्या गोष्टी म्हणजे भाऊंचे ( डॉ. विकास आमटे ) आनंदवनाच्या सुरुवातीपासूनच्या प्रवासाचे वर्णन आणि त्यात नव्यानेच माहिती झालेल्या अनेक गोष्टी, कौस्तुभ आमटे यांचे मार्गदर्शन व त्यातून बाहेर आलेल्या beginning of the beginnig सारख्या संकल्पना, ‘तरुणाईत झपाट्याने पसरणारी व्यसनाधीनताआणि वंचितांच्या शिक्षणाच्या सुधारणेसाठी संचितांची भूमिकाया विषयावर झालेल्या चर्चा, ‘भारत जोडो’, ‘आनंदवन’, ‘एका बालश्री पुरस्कार विजेत्या आणि लहानपणीच अपंगत्वाशी सामना कराव्या लागलेल्या मुलाची कहाणीयासारख्या अनेक विषयांवर दाखवले गेलेले माहितीपट आणि त्यातून मिळालेले मनाला स्तंभित करून सोडणारे विचार, बाबांनी लिहिलेली अनेक अजरामर व मनाला बळ देणारी गीते जी आजही सर्वांच्या ओठांवर आहेत, थक्क करून टाकणारा असा आनंदवनातल्या अंध, अपंग व कुष्ठरोग्यांनी उत्तमरित्या सदर केलेला स्वरानंदवनहा वाद्यवृन्दाचा ( orchestra ) कार्यक्रम, श्रमसंस्कार छावणीच्या शेवटच्या दिवशी वृक्षारोपणानिमित्त उत्स्फूर्तपणे काढलेली वृक्षदिंडी, महापुरुषांच्या विचारांचा लोकांनीच केलेला पराभव सर्वांसमोर आणणारे पथनाट्य, ताडोबाची सफर, वाघाच्या गुहेबाहेर दिसणाऱ्या वाघाच्या पंजांच्या ठशांवरून त्याचे वय ओळखणे या आणि अशा अनेक ......


या ८ दिवसांच्या श्रमसंस्कार छावणीत राहून नक्कीच मनातल्या उत्स्फुर्ततेला आणि शरीरातल्या उर्जेला एक योग्य दिशा मिळाली हे मात्र नक्की !



शृंखला पायी असू दे, मी गतीचे गीत गाई
दुःख उधळायास आता, आसवांना वेळ नाही

-बाबा आमटे


No comments:

Post a Comment