आख्खी मुंबई
समाधान मनाचे शोधताना दूर कुठेतरी निघून आलो
क्षणात बदलणारे जग सोडून समुद्रा काठी विसावलो
सोबतीला होता समुद्रापार येणारा मायेचा वारा
एक आठवणीने उजळून टाकला मनाचा आसमंत सारा
गंभीर हे सागरा खुशाल दे तू मला लोटून किनाऱ्यावर
येणार मी परत तुझ्यावर स्वार होत, भेदत तुझी नजर
सांभाळ तुझे ते झरोके भुर्र्कन अंगाला स्पर्शून उडतात
कानाला लावून चटका मला कशाला उगाच भांबवतात ?
आधी कधी केलंस नव्हतं असं माझ्यासोबत जरी
नको आहे का आज माझा सहवास, खरं सांग तरी
अरे तूच आहेस म्हणून असतो आधार मला पुढे जायचा
नाहीतर कधीच निघून गेलो असतो पाहून रंग तुझ्या पाण्याचा
काहीतरी वाटलं तुझ्यात म्हणूनच येतो ना पुन्हापुन्हा
विसरलो तुला आठवडाभर हाच का रे माझा गुन्हा?
सांगायला कितीतरी गोष्टी आहेत पण वेळ हवा थोडा अजून
खूप दिवसांनी भेटलो, बोलूया की आरामात बसून
तू आधी शांत हो म्हणजे शेजारी तुझ्या बसता येईल
बंद कर खवळणं, नाहीतर आख्खी मुंबई तुला शाप देईल
~ Baje
No comments:
Post a Comment