Sunday, April 21, 2019

कचरावण





 


अमेरिकेतल्या न्यू यॉर्क शहरामध्ये काही महिन्यांपूर्वी एक व्यक्तीने छायाचित्रातला हा असा  पोशाख घालून फिरण्याचा निर्णय घेतला. काय ? का? कसं? हे प्रश्न साहजिकच मनात येतील. पण त्याआधी रॉब ग्रीनफिल्ड या व्यक्तीची गोष्ट पाहूया. थोड्या वेळासाठी त्याचं नाव रघु  असं  ठेऊन .


रघु हा  कॅलिफोर्निया या राज्यात जन्माला येऊन लहानाचा मोठा झालेला अमेरिकन  तरुण. किशोरवयापासूनच इतरांप्रमाणे त्याला उपभोगाच्या गोष्टींचा  पाठलाग करणं अनिवार्य वाटायचं. कार आणि मोठे घर असल्याशिवाय आयुष्यात काही मजा नाही, नशेत हरवून जाण्याशिवाय जगण्यात रस येणार नाही, आज जगायचं तेवढं जागून घ्या-  उद्या काही येणार की  नाही माहिती नाही, या विचारांचा त्याच्या मनावर पगडा असायचा. आणि आश्चर्य म्हणजे  त्याचं हे विक्षिप्त जगणं तो राहत असलेल्या समाजाच्या धारणेनुसार  चांगलंच ‘जगन्मान्य’ होतं. त्यामुळे त्याने स्वतःच्या जीवनशैलीत बदल केल्यावर खऱ्या अर्थानं त्याची गाडी रुळावर आली. गम्मत म्हणजे वर दिलेलं छायाचित्र त्याच्या बदललेल्या नव्या जीवनशैलीच्या काळातलंच आहे. पचवायला थोडं कठीण जातंय ना ? रघु ची बदललेली जीवनशैली त्याला अशा भोळसट वेशभूषेत फिरायला लावते का ? उत्तर पुढे आहेच…
  

काही वर्षांनंतर  पुढे रघु  ला या गोष्टीची लवकरच जाणीव झाली की त्याची जीवनशैली पर्यावरणासाठी एक आपत्ती आहे. त्याने वर्षानुवर्षं चालू ठेवलेला वस्तूंचा प्रचंड उपभोग त्याला आनंदी करत तर नव्हताच , पण निसर्गाच्या विनाशालाही तो  कारणीभूत ठरत होता. टीव्ही आणि इतर माध्यमांमधून त्याला समुद्रात होत असलेल्या प्लास्टिक च्या प्रदूषणाबद्दल कळतच होतं. पण त्याकडे त्याचं फारसं  कधी लक्ष गेलं नाही.  एकदा कुठेतरी त्याच्या वाचनात आलं की रस्त्यावर, गटारीमध्ये , किंवा अगदी डम्पिंग ग्राउंड वर गेलेला कचरासुद्धा पावसाच्या पाण्याबरोबर वाहत जातो आणि समुद्राला मिळतो. त्याने सहजच विचार केला, की आता ह्या सगळ्या  कचऱ्यापैकी त्यानं तयार केलेला कचरा कितीसा असावा? बसून थोडा विचार केल्यावर त्याला कळलं की तो रोज जवळपास सव्वादोन किलो कचरा निर्माण करण्यासाठी कारणीभूत होता. आणि हे फक्त त्याच्याबाबतीत नाही, तर त्याला माहित असलेल्या जवळपास प्रत्येक व्यक्तीबद्दल खरं होतं . अच्युत गोडबोलेंनी दाखवून दिलेलं जगभरातलं (आणि विशेषतः अमेरिकेतलं) चंगळवादाचं थैमान पाहता हे सत्यच होतं . 


रघु भरमसाठ प्रमाणात बिअर पित असे. आता मद्यसेवनाचे दुष्परिणाम हा वादविवादाचा वेगळा मुद्दा आहे. पण त्या मद्याच्या बाटल्या आणि त्याबरोबरच्या अगणित अन्नाच्या पाकिटांमधून तयार  झालेला कचरा  कुठे जायचा बरं ? रघु जवळपास दर दिवशी प्लास्टिकच्या वेष्टनात बांधून येणारे वेफर्स खायचा. खाऊन झाल्यावर ही वेष्टनं कुठे जात असतील बरं? या वेफर्सच्या सेवनाचा आरोग्यावर होणारा परिणाम त्याला माहित होताच, पण त्याच्या  पर्यावरणावर होणाऱ्या  परिणामाने  त्याचं लक्ष वेधलं . एक वेळ त्याच्या आरोग्याची काळजी करणं त्याला महत्त्वाचं वाटलंही नसेल, पण पर्यावरणाच्या आरोग्याशी त्यानं खेळणं त्याच्या तत्त्वांच्या विरोधात जात होतं  का ? या विचारांनी रघूला दिवसरात्र पछाडलं.


आणि शेवटी एके दिवशी  हा सगळा  विचारांचा कल्लोळ रघूच्या जीवनशैलीत बदल घडायला कारणीभूत ठरलाच. त्याने त्याच्या राहणीमानात बदल करून कमीत कमी  कचरा निर्माण करत जगण्याचा निर्णय घेतला. वर्षानुवर्षं प्रयत्न करून त्यानं त्याच्या रोजच्या  जीवनशैलीत कचरा तयार होणं  टाळत जाऊन   शेवटी एका छोट्याशा बाटलीत मावेल इतका तो कमी केला.




आता रघूच्या जीवनशैलीतून तयार होणारा कचरा कमी झाला खरं , पण अमेरिकेतला  सर्वसामान्य माणूस मात्र नेहमीप्रमाणेच दोन- सव्वादोन किलो कचरा रोजच निर्माण करत होता . अशा सर्वसामान्य माणसाला  हे दाखवून द्यायचं कसं ?  रघु ला त्याच्या वर्षानुवर्षांच्या प्रयोगात एक गोष्ट लक्षात आली. कचरा एकदा फेकून दिला, की पुन्हा  त्याच्याकडे कोणाचंच लक्ष जात नाही. पण जर तोच कचरा एखाद्याने त्याच्याजवळ ठेवायचा, फेकून नाही द्यायचा असं ठरवलं तर ? रघुने हा प्रयोग करूनच पाहायचं ठरवलं आणि तो करण्यासाठी अमेरिकेतलं  सर्वात मोठं असं न्यू यॉर्क हे शहर निवडलं . काही दिवसांतच तो तो तिथे दाखल झाला आणि त्याने ‘सर्वसामान्य’ माणसासारखं जगणं सुरु केलं . इतरांसारखा तोही मग फास्ट फूड च्या गाडीवरून प्लास्टिक च्या पेटीत  अन्न  विकत घेऊन खाऊ लागला. दुकानातून कॉफी घेतल्यानंतर त्याचा कप कचऱ्याच्या रूपात उरायला लागला. सुपरमार्केट मधून  सामान विकत घेताना पिशव्यांमध्ये ते सामान तो घेऊन येऊ लागला. या  सगळ्यामध्ये  फरक फक्त इतकाच होता,  की रघु हा सर्व  कचरा फेकून न देता एका पिशवीत भरून, ती पिशवी त्याच्या अंगाखांद्याला लटकवून, चालत असे. बरं , ह्या कचऱ्याला वास यायचा का ? तर नाही.  रघु स्वतःच्या प्लास्टिक च्या वापरातून आलेला  बऱ्यापैकी सर्व सुका कचरा नीट धुवून मगच तो परिधान करत असे. आणि ओला कचरा तो यात समाविष्ट करत नसे. असं बरेच दिवस चाललेलं असताना  त्याचा हा उपक्रम लोक कुतूहलाने पाहत होते.


शेवटी एक महिन्यानंतर त्याच्या अंगाखांद्यावरचं हे अक्राळविक्राळ ओझं सगळ्यांच्या नजरेत रोजच  भरू लागलं.  लवकरच लोकांनी याची गंभीरतेने  दखल घ्यायला सुरुवात केली. एरवी आपल्यामुळे तयार होत असणाऱ्या कचऱ्याची काहीच पर्वा न करणारे लोक रघु च्या या उपक्रमामुळे थोडं थांबून आपण काय करतोय आणि त्यामुळे काय होतंय याबद्दल विचार करू लागले. सुरुवातीच्या फोटोमध्ये दिसतंय तसं रघु जेव्हा न्यू यॉर्क च्या रस्त्यावरून चालायचा , तेव्हा लोकांच्या मनातलं कुतूहल जागं होऊन त्यांनी त्याचं एक नाव पण ठेवलं - ट्रॅश मॉन्स्टर - ‘कचरावण’ !
हेच कुतूहल नंतर जाणिवेत बदलायला सुरुवात झाली आणि रघूचं उद्दिष्ट यशस्वी होऊ लागलं. परंतु हा बदल खूप हळू हळू सर्वत्र पसरणार आहे याची रघुलाही जाणीव होतीच. त्यामुळे तो तिथेच थांबला नाही. त्याने कचऱ्याच्या प्रश्नावर जनजागृतीसाठी  अजूनही बरेच मनोरंजक प्रयोग केले. ते पुढच्या एखाद्या लेखात पाहुयातच .

असे हे  अनोखे  प्रयोग करत  आपला रघु, म्हणजेच रॉब ग्रीनफिल्ड पर्यावरणाच्या प्रश्नांसाठी  स्वतःला झोकून देतोय. त्याच्या संकेतस्थळाला कधीतरी भेट द्याच!

उपयुक्त संकेतस्थळांच्या  लिंक्स :

(छायाचित्रे  परवानगीसहित वापरलेली  आहेत )


No comments:

Post a Comment